बँकेचे कर्ज लपवून वकिलाची ३१ लाख रुपयांची फसवणूक

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : बँकेचे कर्ज असल्याचे लपवून दोन दुकानांची विक्री करत वकिलाची ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी पिता पुत्राला अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील महाराणा प्रताप चौकातील सुभाष मस्के यांच्या मालकीची दोन दकाने अॅड. कृष्णा ठोंबरे यांनी
बाळासाहेब पवार यांच्या मध्यस्थीने ३१ लाख रुपयांना विकत घेतली होती. मात्र, हा व्यवहार होण्यापूर्वीच मस्के यांनी संबंधित दुकानांवर एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून २५ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले होते.

ही बाब त्यांनी खरेदीदारापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली. व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मस्के यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत, परिणामी बँकेने ही दुकाने लिलावात काढली. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. खरेदीदाराने विचारणा केली असता मस्के यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुभाष भाऊसाहेब मस्के (६४) आणि अमोल सुभाष मस्के (३१, रा. तांदुळवाडी) या दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.